Site icon Aarogyaniti

पायाला तेल लावून मसाज करण्याचे फायदे | पादाभ्यंग कोण करावे व कोण करू नये याबद्दल सविस्तर माहिती.

पायाला तेल लावून मसाज करण्याचे फायदे | पादाभ्यंग कोण करावे व कोण करू नये याबद्दल सविस्तर माहिती | Benefits of Massaging foots with oil, Padabhyang

आज आपण पादाभ्यंग म्हणजेच पायाला तेल लावून मसाज करणे यासंदर्भात पूर्ण माहिती पाहणार आहोत,व असे करण्याचे आपल्या शरीराला काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.
तसे पाहायला गेले तर आयुर्वेदातील सर्व प्रमुख आचार्यांनी आपल्या पूर्ण शरीराला तेल लावून मसाज करा असे सांगितले आहे, परंतु आजकालच्या धावपळीच्या युगात आपल्याकडे एवढा वेळ नसतो म्हणून अष्टांगृदयम या ग्रंथामध्ये दिनचर्या बद्दल सांगताना असे लिहिले आहे की शिरःश्रवणपादेषु तं विशेषेण शीलयेत् | म्हणजेच डोके कान आणि पाय यांना विशेष रूपाने अभ्यंग करणे गरजेचे आहे.
आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पायाला तेल लावून रोज मसाज केल्याने आपल्या शरीरात त्याचे काय काय सकारात्मक परिणाम होतात, कधी करावे, कोण करावे, कुठल्या परिस्थितीमध्ये हे करणे टाळावे याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.


सुरुवात करूया आचार्य चरक यांच्यापासून आचार्य चरक या संदर्भात काय म्हणतात ते आपण पाहू.

खरत्वं स्तब्धता रौक्ष्यं श्रमः सुप्तिश्च पादयोः । सद्य एवोपशाम्यन्ति पादाभ्यङ्गनिषेवणात् ॥
जायते सौकुमार्यं च बलं स्थैर्य च पादयोः । दृष्टिः प्रसादं लभते मारुतश्चोपशाम्यति ।।
न च स्याद्गृध्रसीवातः पादयोः स्फुटनं न च । न सिरास्नायुसङ्कोचः पादाभ्यङ्गेन पादयोः ।।

म्हणजेच दोन्ही तळपायाला रोज तेलाने मसाज केल्यास पायमधील जडपणा , कोरडेपणा , थकावट शीघ्र म्हणजेच लवकर कमी होते.पायांमध्ये ताकत येते तसेच पाय सुदृढ होतात.पायांना तेलाने मसाज केल्यामुळे डोळ्यांची दृष्ट्टी सुधारते.शरीरात वाढलेले वात विकार कमी होतात.वातप्रकोपामुळे वाढणारे आजर होण्याची संभावना रहात नाही.पायाला तेल लावून घासल्यामुळे पायांना भेगा पडत नाहीत.तसेच शिरा आणि स्नायू यांचे आजार होत नाहीत.
आचार्य चरक यांनी यामध्ये विशेष करून सायटीका या आजाराबद्दल सांगितले आहे.रोज पायाला तेल लावून मसाज केल्यास सायटीका सारखा आजार सुद्धा कमी होतो.

आता आपण पाहू पादाभ्यांग कधी करायला हवे? तर आपल्याला दररोज पादाभ्यांग करायचेच आहे. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पायाला तेल लावून मसाज करू शकता सकाळी आंघोळीपूर्वी किंवा अंघोळ झाल्यानंतर सुद्धा तुम्ही पायाला तेल लावून मसाज करू शकता. परंतु जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी मसाज केला तर तुम्हाला रात्री झोप देखील चांगली येईल, तुमचा दिवसभराचा थकवा देखील निघून जाईल आणि जे तेल तुम्ही पाहायला लावले आहे ते जास्त वेळासाठी पायाला राहील. म्हणून रात्री झोपताना पायाला तेल लावलेले सर्वोत्तम आहे.
पादाभ्यांग हे रोज कमीत कमी दहा मिनिटे करावे रात्री दहा मिनिटे पादाभ्यांग केल्यास तुम्हाला अतिशय गाड अशी झोप लागेल व सकाळी उठल्यानंतर तणावमुक्त आणि स्ट्रेस फ्री झाल्याचे जाणवेल.


तिळाचे तेल, नारळाचे तेल,महानारायण तेल,चंदन बला लाक्षादी तेल,किंवा गाईचे तूप याचा वापर तुम्ही पादाभ्यांग करण्यासाठी करू शकता.
अजून सविस्तर पाहायला गेले तर शरीरात वात आणि कफ यांचे प्रमाण वाढले असेल तर तिळाचे तेल तुम्ही वापरू शकता तसेच शरीरात पित्तदोष वाढलेला असेल पायात जळजळ होत असेल तर तुम्ही गाईचे तूप वापरू शकता. ज्यांना बऱ्याच वर्षांपासून मधुमेह आहे ते गावरान गाईचे तूप वापरू शकतात डायबिटीसमुळे होणारी पायातील जळजळ यामुळे कमी होते.

ज्यांना सर्दी खोकला यासारखे आजार झाले आहेत, अजीर्ण असेल किंवा वमन विरेचन सारखी क्रिया केलेल्या दिवशी पादाभ्यंग करायचे नाही. तसेच जेवण झाल्या झाल्या लगेच पादाभ्यांग करायचे नाही. याव्यतिरिक्त सर्वजण पादाभ्यांग करू शकतात.

Exit mobile version